वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Bharatatil Vastusangrahalyancha Parichay