-
प्राचीन भारत (प्रारंभापासून ते इ.स. 1000 पर्यंत)
प्रारंभी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती ही आधुनिक असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टीवर भारतीयांचा विश्वास नव्हता. कारण या देशातील धर्म, चालीरिती, श्रद्धा, रूढी आणि परंपरा या प्राचीन असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर या प्राचीन संस्कृतीस मान्य करावयास तयार नव्हते. परंतु 19 व्या शतकात पंजाबमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु झाले आणि त्याठिकाणी प्राचीन वीटा आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडू लागले आणि त्यातून ब्रिटिशांचे डोळे खाडकन उघडले. उत्खनन करण्यात आले तेव्हा मोहेनजोदाडो आणि हडाप्पा सारखी प्राचीन शहरे सापडली. सिंधु संस्कृतीचा शोध लागला. उत्कृष्ट नगर रचना, आरोग्यासाठी केलेली सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, मनोरंजनाची साधने जेव्हा तेथे उत्खननात सापडली त्यावेळी भारतीय संस्कृती जगातील प्राचीन चीन, इजिप्त आणि बॅबिलोनिया या प्राचीन संस्कृतीच्या रांगेत जावून बसली. आर्य संस्कृतीने या देशाला नवा मंत्र दिला. जैन आणि बौद्धांनी त्यातील दोष काढून येथील मानवाला अहिंसेचा संदेश दिला. सद्वर्तन आणि नैतिकता त्यांनी शिकविली. शिल्प आणि सांस्कृतिकजीवनात बदल घडविले. नंतर मौर्य, गुप्त, वर्धन, शुंग, राष्ट्रकूट इत्यादी यासारखी नवीन घराणी उदयास आली. येथील जीवनात क्रांती घडावी अतएव येथे नालंदा, तक्षशीलासारखी विद्यापीठे जन्मास आली. अरबांना या शैक्षणिक केंद्रांचे महत्व न कळाल्याने त्यांनी ती उध्वस्त केली. पण त्यापूर्वीच आग्नेय आशियात भारतीय संस्कृती जावून पोहोचली होती. यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास म्हणजे प्राचीन भारत हा ग्रंथ होय.