नव्वद नंतरचे साहित्य हा एकूणच जगभरातील साहित्याच्या बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जागतिकीकरणाने मानवी जगण्यात, त्यातून निर्माण झालेल्या वर्तनात, मानव-पशु, मानव-पक्षी, मानव-निसर्ग, मानव-पर्यावरण आणि माणूस-माणूस यांच्या नात्यातील वीण उखडलेली जाणवू लागली. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी लीलाधर मंडलोई म्हणतात, ‘जागतिकीकरण यह ऐसा बाजार है जो हमारे सामान की नही रिश्तों की भी नीलामी करवाता है|’ तसेच मानवी जगण्यातील माणुसकी ह्या चिवट मूल्याला उद्ध्वस्त करून पैसा हेच मानवाचे प्रभावी मूल्य ठरू लागले. एकूणच मानवाच्या आतापर्यंतच्या जीवनमूल्यांना उद्ध्वस्त करून त्याच्या जगण्याला मिळालेली कलाटणी, या सगळ्यांचा परिणाम नव्वदोत्तरच्या जागतिकीकरणातून जाणवतो. त्याचा आदिवासींच्या जगण्यावर परिणाम झाला का? की आणखी कुठल्या घटकाने आदिवासींचे जगणे आपल्या मुळांपासून उखडून टाकले, वर्तुळापासून परिघावर गेले? या सर्वांचा शोध नव्वदोत्तर आदिवासी कवितेतून घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
Navadottar Adivasi Kavita