‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.
21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.
Samayojnache Mansshastra