आधुनिक काळात शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये नवनवीन विचारप्रवाह येत आहेत. भारत सरकारने बालकांच्या शिक्षणासाठी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षणाचे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वामध्ये समाविष्ट होते. प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची राज्याची जबाबदारी आहे. सर्वसामान्य बालकांबरोबर विशेष गरजा असणार्या बालकांनाही हा शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणार्या बालकांना अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सौम्य व मध्यम अपंगत्व असणारी बालके सामान्य बालकांबरोबर शिक्षण घेऊ शकतात. यामुळे त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना दूर होते, तसेच त्यांचे सामाजीकीकरण होण्यास मदत होते. देशातील प्रत्येक बालकाला मुलभूत प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मोहिम सुरु केली. या मोहिमेला सर्व शिक्षा अभियानामुळे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या अभियानामध्ये अपंग समावेशित शिक्षण ही योजना राबविण्यात आली. यातूनच समावेशित शिक्षण ही संकल्पना विकसित झाली.
या पुस्तकात समावेशित शिक्षणाची संकल्पना, विशेष गरजा असणारी बालके, समावेशित शाळा व समावेशित शाळेतील शिक्षक या मुद्यांचा विचार केला आहे. सद्याच्या युगात प्रत्येक बालकाच्या कौशल्य विकसनावर भर देण्याची आवश्यकता आहे. विशेष गरजा असणारी बालके राष्ट्र विकासात भरीव योगदान देऊ शकतात. या बालकांच्या शिक्षणाकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी हा संदर्भ ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
Samaveshit Shala V Shikshak