कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या यशस्वी उद्दिष्ट्ये पूर्तीचे आणि यशापयशाचे श्रेय कुशल मानव संसाधनालाच आहे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत त्या शिवाय अलिकडच्या काळात माहिती तंत्रज्ञान हा घटक जोडला जातो. हे सर्व घटक एकत्र आल्याशिवाय कोणत्याही वस्तूंचे उत्पादन शक्य नसते. त्यामुळे मानवाचे ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, प्रवृत्ती इत्यादींचा श्रम या उत्पादन घटकांवर अपरिहार्य परिणाम असतो. संस्थेत कार्यरत असणार्या विविध स्तरांवरील कर्मचारी किती कार्यक्षमतेने, कौशल्याने, जबाबदारी आणि स्वयंप्रेरणेने कार्ये करतात यावरच संपूर्ण व्यवस्थापनाची परिणामकारकता अवलंबून असते. कर्मचार्यांकडून योग्य प्रकारे आणि जास्तीत जास्त कार्ये घेणे हाच कर्मचारी व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश असतो.
मानव संसाधन व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. या विषयात व्यवस्थापनातील मानवी घटकांबाबत असणार्या सर्वच पैलुंचा सुक्ष्मपणे अभ्यास करावा लागतो. या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि विषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच व्यवसाय संस्थांमधील आणि उपक्रमातील मानव संसाधन व्यवस्थापन व विकास संदर्भातील सर्व अद्यावत तंत्रे आणि मानसशास्त्रीय सिद्धांताचाही परामर्श सदरील पुस्तकात अत्यंत सुलभ भाषेत घेतला आहे.
Manav Sansadhan Vayvsthapan