दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मजागृतीचा जो वसा दिला, त्यातून दलित समाजातील नवशिक्षित तरुण आपले प्रश्न, समस्यांना लेखनाच्या माध्यमातून उजागर करू लागला. आपल्यावर व समाजावर होणार्या अनन्वित छळाचा व अन्यायाचा प्रतिकार करू लागला. आपल्या जगण्याला, प्रश्नांना तो साहित्यातून कलात्मक रूप देऊ लागला. त्यातूनच दलित जीवनजाणिवा अभिव्यक्त करणारे साहित्य निर्माण झाले. 1960च्या दशकानंतर या साहित्याने एका चळवळीचे, प्रवाहाचे रूप धारण केले, तोच पुढे दलित साहित्याचा प्रवाह म्हणून विकास पावला. या साहित्यातून दलित समाजाच्या सर्व अंगोपांगांचे, त्यांच्या प्रश्नांचे, हक्क, न्याय, समानतेच्या मागणीचे संदर्भ त्यांच्या खास अशा भाषिक व्यवस्थेतून जीवनजाणिवांसह चित्रित झाले आहेत. दलित साहित्य हे व्यक्तीच्या जगण्याला प्रतिरोध करणार्या व्यवस्थेच्या विरोधात निर्माण झालेले साहित्य आहे. जगण्याच्या धडपडीला अर्थ मिळवून देणारे, माणसाचे माणूसपण सिद्ध करण्यासाठी, परंपराधिष्ठित व्यवस्थेला आपल्या जगण्याविषयीचे प्रश्न विचारणारे, मानवी मूल्यांचा पाठपुरावा करणारे, साहित्य म्हणून दलित साहित्याने मराठी साहित्यविश्वातच नव्हे, तर जागतिक साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वंचितांचे, पीडितांचे, अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे साहित्य म्हणून दलित साहित्याचा झालेला गौरव विश्वविख्यात आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही ‘भारतीय भाषांतील दलित साहित्य’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. मराठी भाषेतून आलेल्या संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयांतील प्राध्यापक व अभ्यासकांचे लेख या पुस्तकात समाविष्ठ करत आहोत. मराठी दलित साहित्याच्या बहुविध आयामांचा वेध घेणारे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत.
स्वतःचे अस्तित्व स्वतःच्या बळावर टिकवणारा एक सकस साहित्यप्रवाह म्हणून दलित साहित्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या साहित्यप्रवाहातील लेखनप्रकारांची चर्चा व्हावी ही मराठी भाषाविभागाची भूमिका होती. यानिमित्ताने जाणते अभ्यासक, नवोदित अभ्यासक व संशोधक यांचे विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित साहित्यातील साहित्यप्रकारांची चर्चा, त्यांतील निवडक नोंदी, या साहित्याच्या आकलनाच्या दिशा यांसंदर्भात विविध अभ्यासकांच्या निबंधांना येथे स्थान दिले गेलेले आहे. या अर्थानेच ‘दलित साहित्याचे बहुविध आयाम’ नवोदितांसमोर येतील.
(संपादकीय मधून)
Dalit Sahityachea Bahuvid Ayam