-
काव्यतरंग
मानवी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे जगण्याचे दृष्टीकोन असतात. व्यवस्थेबद्दल काही बोलताना कवीची कविता ही व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमधून वाचकांसमोर येत असते. कवीच्या काव्यातील जाणिवांचा अपरिहार्य भाग काव्यरुपाने रसिक वाचकांसमोर येत असतो. त्यातून कवीचे भावविश्व व एकंदर परिस्थितीचे आकलन होताना दिसते. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचे केवळ वर्णन न करता कवी आजच्या माणसासमोरचे जगण्याचे प्रश्न टोकदारपणे मांडताना दिसतात. वाड्या-वस्त्या, ग्रामीण, निमशहरी, शहरी या परिसरातील मानवी जीवनाचे जगण्याचे ताणे-बाणे, अंतर्गत व बाह्य संघर्ष, कवींच्या लेखणीतून अपरिहार्यपणे येतात. भावनांनी ओथंबलेल्या कवी मनाचे अविष्कार विविध विषयांना थेटपणे भिडतात.
नव्या कवींकडे असलेली सर्जनात्मक प्रतिभा मानवी समाजव्यवस्थेला आस्वादात्मक पातळीवर कशा प्रकारे आकृष्ट करते यावर त्या कवीच्या कवितेचे मूल्यमापन होते. या कसोटीवर खानदेशच्या कवींनी लिहिलेल्या कविता एक नव्या दिशेकडे नेणार्या आहेत हे निश्चित.Kavyatarang
-
खानदेश : साहित्य आणि संस्कृती
प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या भूमिकेतून ‘खानदेश’ या प्रदेशाचे पृथगात्म संस्कृतीविशेष संशोधन-अभ्यासाच्या प्रक्रियेतून उलगडून दाखविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रदेशविशिष्ट अस्मितांचा जागर करणे, एवढ्या संकुचित अर्थाने याकडे पाहणे उचित नाही. स्वसमाज-संस्कृतीचे निरीक्षण, परीक्षण करून पुनर्मूल्यांकन करण्याची दृष्टी त्यात अभिप्रेत आहे. या दिशेने व्यापक स्तरावरून आणि विविधांगांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर पुस्तकाचा विचार करावा लागतो. खानदेशातील साहित्याच्या अभ्यासावर प्रकाश टाकणार्या या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अभ्यासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
– डॉ. आशुतोष पाटील
Khandesh : Sahitya Aani Sanskruti
-
खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या
साने गुरुजींनी खानदेशाच्या गौरवार्थ ‘वैभवेश’ हे विशेषण वापरलेले आहे. बी.एन. हा या वैभवेशाचा पुत्र खरा, पण एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि बालपणीच मातृवियोगाचा आघात पचवलेला पुत्र! खडतर आयुष्यात त्याने जे काही सोसलं, ते एखाद्या शोकात्म कादंबरीसारखं आहे. पण आयुष्यात हे असलं हलाहल पचवणाऱ्या या माणसाच्या हृदयात मात्र खानदेशी गोडव्याचं अमृत आहे! अगदी बहिणाबाईंच्या कवितेतला गोडवाच म्हणा ना! मातेविना पोरका असा हा मुलगा एक मातृहृदयी पुरूष म्हणून जगला. साधेपणा, ऋजुता, पारदर्शीपणा याच्या अंगात मुरलेला. याचं विद्यार्थीप्रेम हे हृदयाच्या अंतर्हृदयातून पाझरलेलं. याच्यातला सामाजिक सेवाभाव म्हणजे जणू कानबाईने दिलेला कानमंत्रच! एका व्यक्तीचा काही व्यक्तींनी केलेला गौरव, एवढेच या गौरवग्रंथाचे महत्त्व नाही. माझ्या मते त्याला एक प्रतिकात्मक मूल्य आहे. बीएन ही निव्वळ एक व्यक्ती नाही, तर ती एक चालतीबोलती संस्था आहे. ते केवळ एक अभ्यासू शिक्षक नाहीत, तर एका वैचारिक परंपरेचे डोळस प्रतिनिधी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे वा वैचारिक पंथाचे ‘लेबल’ त्यांनी लावलेले नाही. पण त्यांच्यामध्ये समाजवादी आणि सर्वोदयी विचारांचा सुंदर समन्वय झालेला आहे. महाराष्ट्रात साने गुरूजींमध्ये आणि देव-जावडेकर-भागवत वगैरे आचार्य-परंपरेमध्ये गांधीवाद, लोकशाही, समाजवाद यांचा जो सुरेख मेळ साधला गेलेला आढळतो, तसा तो बीएन यांच्या जगण्यावागण्यातून प्रत्ययास येतो. शिक्षकी पेशाचं अवमूल्यन झालेल्या काळात असे शिक्षक आचार्य कुलाचं एखादं ओॲसिस उभारतात. शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण आणि मूल्यांचा ऱ्हास चालू असताना असे काही ‘अव्यवहारी’ लोक स्वार्थाच्या बाजारातसुद्धा परमार्थाची गुढी उभारतात. वर्किंग अवर्स, वेतन आयोग, बाळसेदार बायो-डेटा हे सगळं गरजेचं. वाटत असेल अध्यापकांना; पण त्यापलीकडे जी व्यक्ती पोहोचली, अध्यापन हा जिने ‘धर्म’ मानला आणि शिक्षकी पेशातले सामाजिक उत्तरदायित्व जिने जाणले, तीच व्यक्ती शिक्षकी-पेशाला खऱ्या अर्थाने जागली, तिलाच खरा यतिधर्म समजला! बीएन हे या जातकुळीतले शिक्षक आहेत. म्हणून निवृत्तीसमयीचा त्यांचा गौरव हा निव्वळ उपचार नव्हे, ती नुसती सत्काराची शाल नाही, तर प्रेरणेची मशाल आहे.
– राजा दीक्षित
सुप्रतिष्ठित प्राध्यापक,
इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेKhandesh Vaibhav : Kal, Aaj Aani Udya
-
खानदेशातील साहित्य
खानदेशाला साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. विविध वाङ्मयप्रकार व प्रवाहात खानदेशी साहित्यिकांनी आपला ठसा उमटविलेला आहे. मराठीतील चौथा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडेंच्या रुपाने खानदेशाला मिळाला व कधीकाळी मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी असलेला ‘खानदेश’ पुन्हा मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे. प्रारंभापासून आजतागायत या समृद्ध साहित्याची समीक्षा मात्र अभावानेच झालेली दिसून येते. त्यामुळे खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांना अडचणी निर्माण होत आलेल्या आहेत. ‘खानदेशातील साहित्य’ हा ग्रंथ मात्र खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
सदर संपादित ग्रंथात विषयाचे सर्वस्पर्शित्व विशेषत्वाने दिसून येते. उपेक्षित राहिलेल्या कवी, लेखक, वाङ्मयप्रकार, नियतकालिके, लोकवाङ्मय यांवर नव्या दमाच्या अभ्यासकांनी नव्याने टाकलेला प्रकाश निश्चितच कौतुकास्पद आहे.
– डॉ. शिरीष पाटील
Khandeshatil Sahitya
-
जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव
Jagatikikaranacha Marathi Bhasha V Sahityavaril Prabhav
-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने
‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने’ या ग्रंथात विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, आदिवासी बंधू-भगिनींचे भारतीय स्वातंत्र्यासाठीचे, योगदान आझाद हिंद फौजेतील कार्य, विविध जिल्ह्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान, सविनय कायदेभंग चळवळीतील सर्वसामान्यांचे विविध प्रकारचे योगदान, राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्रे, हैदराबाद मुक्ती आंदोलनातील विविध बंधू-भगिनींचे योगदान, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व तत्कालीन उद्योजक, पूज्य साने गुरुजींचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल पोवाडे, समर गीते, क्रांतिकारी चळवळी, गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतलेल्या व हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत, हिंदी साहित्याचे स्वातंत्र्य चळवळीशी असलेले नाते अशा स्वरूपाचे विविध संशोधनात्मक लेख समाविष्ट आहेत. या लेखांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीची अनेक टप्पे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले गेलेले आहेत. हैदराबाद मुक्ती आंदोलनाच्या बाबतीत निजामाची सत्ता, निजाम ब्रिटिश सरकारला अनुकूल असणे, स्थानिक लोकांना निजामी शासन अवजड वाटणे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद मुक्ती आंदोलन सुरू ठेवणे, हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट करण्याचा त्यांचा हेतू असणे, हे आंदोलन सर्वधर्मसमभावी असणे असे वैशिष्ट्यपूर्ण लेख यात आहेत. गोवा मुक्ती आंदोलनाचाही पैलू मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
Bharatiya Swatantrya Chalvalichi Suvarnapane
-
समकालीन साहित्य मीमांसा
साहित्यकृती ही विशिष्ट वाङ्मयप्रकारांतर्गत आविष्कृत होत असली तरी तिची म्हणून काहीएक स्वायत्तता असते. म्हणूनच अनेक अंगाने तिचे विश्लेषण संभवते. अनेकानेक समीक्षा पध्दतीने साहित्यकृतीची मीमांसा शक्य आहे तथापि साहित्यकृतीचा आशय हा चिकित्सेचा गाभा आणि दिशा सूचित करतो. मीमांसकाने साहित्यकृतीच्या अंतरंगातील हे सत्व ओळखले की साहित्यकृतीचे वाङ्मयीन मूल्य आणि सौंदर्य उलगडता येते.
डॉ. वासुदेव वले यांनी विविध वाङ्मयप्रकारातील लक्षवेधी साहित्यकृतींचा असाच सामर्थ्यशाली आढावा या ग्रंथात घेतला आहे. प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्याची ही ‘समकालीन साहित्य मीमांसा’ सर्जनशील तर आहेच पण आस्वादाच्या रसरशीतपणाचा प्रत्यय देणारीही आहे. डॉ. वासुदेव वले यांनी या समीक्षाग्रंथातून आपला वेगळा मीमांसक दृष्टिकोन अभ्यासकांसमोर ठेवला आहे. तो लक्षणीय आणि म्हणून महत्त्वाचा आहे.– प्रा. डॉ. मनोहर जाधव
मराठी विभाग प्रमुख/अधिष्ठाता मानव्य विद्या/
प्रमुख- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.Samkalin Sahitya Mimansa
-
समीक्षा पद्धती आणि उपयोजन
सम्यक ईक्षा ती समीक्षा असे म्हटले जात असले तरी त्यात सम्यक् दृष्टीकोन किती हा प्रश्नच आहे. साहित्याचा प्रांत बहुरंगी असल्याने समीक्षासुध्दा बहुरंगी वा बहुआयामी बनते. समीक्षेच्या क्षेत्रात अनेक पध्दती किंवा संप्रदाय रुढ झालेले आहेत. संतप्रणाली, पंडिती परंपरा, केशवसूत संप्रदाय, मर्ढेकरी किंवा नेमाडपंथी असे शब्दप्रयोग या क्षेत्रात आढळतात. असे संप्रदाय वा अशा परंपरा आजच्या साहित्याला खरोखरच उपयुक्त ठरतील का? व्यक्तिनिष्ठ लेखनाची गती आज वाढत गेल्याचे चित्र दिसते. समीक्षेच्या संदर्भात एक प्रश्न सातत्याने मनात येतो तो असा की, आपल्या समीक्षा विचाराच्या परंपरेत आरंभकाळात संस्कृत साहित्यशास्त्राचा पगडा दिसतो. पण नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटीश राजवटीत या समीक्षेने नवी वाट चोखळली, त्यामुळे इंग्रजी विचारांचा प्रभाव लक्षात येतो. म्हणजेच मराठी समीक्षा एका बाजूने संस्कृतच्या आधाराने व दुसज्या बाजूने इंग्रजीच्या आधाराने विकसित झाली. मग मराठीला मराठीची समीक्षा आहे का? हा प्रश्न पडतो. ज्याचे नेमके उत्तर देणे अवघड जाते.
Samiksha Paddhati Ani Upyojan