खानदेशला साहित्याचा वारसा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर यामध्ये निश्चितपणे चांगली भर पडलेली आहे. हा वारसा समृद्धपणे जतन करण्याचे काम आजची नवकवींची पिढी तितक्याच ताकदीने करत आहे. या नवकवींमध्ये अशोक सोनवणे, पांडुरंग सुतार, संजीवकुमार सोनवणे, चामुलाल राठवा व रावसाहेब कुवर हे अग्रणी आहेत. नव्या-जुन्यांचा चांगला मेळ घालून संवेदनशील, विचारप्रवर्तक, सामाजिक जाणीवांनी भरलेल्या, दुर्दैम्य आशावादाने प्रेरित असलेल्या या नवकवींच्या कविता निश्चितच आपल्याशा वाटतात. समकालीन जाणिवांचा अचूक वेध घेण्याचे, कवितेच्या कलात्मकतेची बाजू सक्षम असण्याचे, वाचकरसिकांना अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य या खानदेशकवींच्या कवितेत निश्चितपणे आहे. खानदेशच्या या ‘काव्यतरंग : एक आस्वाद’ या पुस्तकात जुन्या-नव्या कवींचा समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हे कवी निश्चितच ढवळून काढतील व ज्ञानाचा, संवेदनशीलतेचा नव्याने परिचय करुन देतील एवढी ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरेल. मराठी कवितेच्या प्रांगणातील खानदेशी कवींचे स्थान, एकूणच काव्य वाङ्मयातील स्थान याबद्दल काही एक निर्णय घेण्यास ही समीक्षा उपयुक्त ठरावी. याखेरीज काव्य: संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये, कवितेचे घटक, कवितेेचे प्रकार, मराठी कवितेची वाटचाल, खानदेशची काव्य परंपरा हा भाग उपयुक्त ठरावा, यासंबंधीची सखोल चर्चा सदरील पुस्तकात केली आहे.
Kavyatarang Eka Aswad