-
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन
21 वे शतक हे स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जाते. जिथे स्पर्धा म्हटली तिथे अचूक अभ्यासक्रम समजून घेणे, संदर्भ ग्रंथ, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अशा गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते.
आपल्या देशाचा विचार केला असता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. त्याप्रमाणात नोकर भरतीची गरज वाढते; तसेच विविध विभागातील पदे सेवानिवृत्तीमुळे व नैसर्गिक वाढीमुुळे रिक्त होतात. त्यामुळे दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षांमार्फत विविध विभागात नोकर भरती केली जाते. याठिकाणी प्रचंड स्पर्धा असते. अशा या स्पर्धेमध्ये अचूक संदर्भ ग्रंथांची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. कारण स्पर्धेत जिंकायचे असेल तर तुमच्याकडे योग्य संदर्भ ग्रंथ असणे महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर एम.पी.एस.सी.राज्य सेवा (मुख्य परीक्षा) व पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/मंत्रालय सहायक (मुख्य परीक्षा) तसेच तलाठी, ग्रामसेवक, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (ढएढ), जिल्हा निवड समिती अंतर्गत वरिष्ठ/कनिष्ठ लिपिक भरती, सरळ सेवा – समाज कल्याण निरीक्षक, पाटबंधारे निरीक्षक, वनविभाग, पोलीस भरती, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नेट (मराठी), सेट (मराठी) इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. मराठी भाषा व मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास वरील परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आपली मातृभाषा मराठी आहे. आपण दररोज मराठी ऐकतो, बोलतो म्हणजे आपल्याला मराठी व्याकरण येतेच असे नाही, तर त्यासाठी मराठी व्याकरणाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो.