विद्रोह, आकांत, आक्रोश, उद्रेक, विध्वंस, या शब्दांशी परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा जवळचा संबंध आहे. वरकरणी हे शब्द अतिरंजित भाव प्रकटीकरण दर्शक जरी वाटत असले तरी उपेक्षितांच्या व वंचितांच्या वाट्याला आलेल्या वेदना प्रखरतेने मांडण्यासाठी याच शब्दांनी मोलाची भूमिका निभावली आहे. हेच शब्द कवी भरत शिरसाठ यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी साथ देतात. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून मानवी जीवनातील हा संघर्ष सातत्याने मांडला गेला आहे. परिवर्तनवादी साहित्य हे भावनात्मक स्वत्व, अभित्व आणि स्वाभिमान यासाठी झुंजणारे साहित्य आहे. रंजन-मनोरंजन हा परिवर्तनवादी चळवळीचा उद्देश नाही. संत चोखा, संत कबीर, संत रवीदास यांपासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबांपर्यंतच्या बहुजनवादी संतांनी आपल्या वाणीने लोकांना जागृत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानाच्या रुपाने आमच्या हातात मानवमुक्तीची हुकमी चाबी दिली आहे. तरीही आजदेखील अन्याय हा शब्द येथील उपेक्षितांच्या जगण्याशी चिकटलेलाच आहे. ते एक तप्त वास्तव आहे. म्हणून संवेदनशिल मनाचे कवी प्रा. भरत शिरसाठ यांच्या काव्यसंग्रहातून खैरलांजीचं जळतं सरण आम्हाला पहायला मिळत आहे. जातीजातींमधील पेटलेल्या वास्तवांचे विस्तव स्वतंत्र चुलीत धगधगताां आज आम्ही बघत आहोत. ही धग कधी शमेल, हा एक मोठा प्रश्न आहे. बहुजनांच्या अनुपरिवर्तनासाठी ही विझणारी धग एक क्रांतीगीत असणार आहे.
Khairlanji, Bhima-Koregaonvaril Halla Ani Itar Kavita