भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाने समाजासाठी संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी लोकांची, लोकांच्या माध्यमातून केलेली एक व्यवस्था आहे, तशी ती मानवेतर प्राण्यांपेक्षा मानवाची एक स्वतंत्र नवनिर्मिती आहे. भाषेशिवाय माणूस ही कल्पनाच करता येणार नाही. भाषा आहे म्हणून माणूस आपले विचार, भावना, कल्पना, संवेदना आणि संदेश मांडतो, स्पष्ट करतो. विचार ही एक मानवी अवस्था असली तरी ती प्रकट करण्याचे समर्थ माध्यम भाषा आहे. विचार जिथे सुरू होतात तिथे भाषेचीही सुरूवात होते. भाषा आणि विचार हे परस्पर निगडित आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचे सवंर्धन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचे व समाजाचे अस्तित्व आणि विकासाचे सातत्य टिकवून ठेवण्याचे अविरत कार्य भाषेतूनच होत असल्याने भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य असे अंग आहे. शब्द, वाक्य आणि अर्थ संकल्पना उलगडण्याची एक शास्त्रीय दृष्टी असलेली कला म्हणजे भाषा शास्त्र आहे.
Varnanatamk Bhasha Vidnyan