संविधान अथवा राज्यघटना ही संज्ञा प्राचीन स्वरूपाची असून विशेषत: भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या काही नवोदित राष्ट्रांनी स्वातंत्र्य प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय व इतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी नियमावलीची निर्मिती करण्यावर भर दिलेला दिसतो. प्रामुख्याने यामध्ये युरोपातील राष्ट्रे, आशिया खंडातील राष्ट्रे यांचा समावेश करता येईल. ग्रीक नगर राज्यात अॅरिस्टॉटलच्या अध्ययन पद्धतीत अनेक देशांचा अभ्यास करून जी नियमावली तयार करण्यात आली ती तुलनात्मक राज्यशास्त्रात महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक स्वरूपाच्या राजदरबारात सुद्धा आपल्या नगरराज्याच्या हितासाठी, प्रजेच्या सुरक्षेसाठी ज्या काही नियमावलींची निर्मिती करण्यात आली ती एकाप्रकारे भविष्यकालीन नियमांच्या बांधणीसाठी अथवा विशिष्ट कायद्याची चौकट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरली. भारताच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास सन 1935 च्या भारत प्रशासन विषयक कायद्यातून निश्चित स्वरूपाची एक दिशा भारतीय संविधानाच्या चौकटीकरिता उपयुक्त ठरली असे म्हणावे लागेल. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया ही घटना समिती व मसुदा समितीच्या माध्यमातून संपन्न झाल्याचे निदर्शनास येते. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांचे तुलनात्मक अध्ययन करून 2 वर्षे, 11 महिने, 17 दिवस अखंड व सातत्यपूर्ण अभ्यासातून भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भरीव स्वरूपाचे योगदान दिले. त्यांनी संविधानातील अनेक लहान-मोठ्या तरतूदी व संकल्पनेवर संविधान सभेत व्यापक विचारमंथन केले. परिणामस्वरूप स्वतंत्र भारताला सामाजिक न्याय मिळवून देण्याकरिता, देशाचे नाव जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून नोंदविण्यासाठी भारतीय संविधान एक दस्तऐवज, मूलभूत ग्रंथ आहे असे आपणास म्हणता येईल.
Bhartiy Sanvidhanachi Olakh