स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य चळवळी संदर्भात तसेच या चळवळीतील खानदेशचे योगदान याखेरीज या खानदेश भूमीचे सर्वांगीण वैभव या गोष्टी वाचकांसमोर मांडाव्या या दृष्टीने विविध उपविषय आम्ही लेखकांना दिले होते. यापैकी बहुतांश उपविषय या ग्रंथातील लेखांच्या माध्यमातून साध्य झाल्याचे दिसते. खानदेशातील स्वातंत्र्याची चळवळ, खानदेशातील आदिवासी क्रांतिकारक, नवीन शैक्षणिक धोरण, खानदेशातील सण उत्सव परंपरा, खानदेशातील ग्रामीण साहित्य, खानदेशातील थोर पुरुष उदाहरणार्थ साने गुरुजी, कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे कार्यकर्तृत्व, खानदेशातील विशेषतः धुळे जिल्ह्याचा इतिहास, फारुकी राजवटीत खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेर नगरीचा इतिहास, खानदेशातील मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान असे खानदेश केंद्री बहुसंख्य लेख या ग्रंथाचे सांस्कृतिक मूल्य वाढविणारे आहेत. स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर खानदेश आज कुठे आहे? खानदेशाची सर्वांगीण प्रगती कशी झाली? या प्रगतीचे टप्पे कोणते? या वाटचालीचे निकष काय? या सर्वांचा उहापोह करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ग्रंथातील सर्व लेखकांनी केल्यामुळे हा ग्रंथ गैर शासकीय गॅझेट या मूल्याचा ठरला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात खानदेशी उद्योजकीय जगत कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे? उद्योगांच्या संदर्भात कोणकोणत्या उपक्षेत्रात वाव आहे याचीही चर्चा करणारे लेख या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. चोखंदळ, अभ्यासू व संशोधक दृष्टी बाळगणाऱ्या वाचकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेशातल्या साहित्याचा, इतिहासाचा, वर्तमानातील घडामोडींचा परामर्श घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल, त्यांच्या अभ्यासासाठी, प्रस्तावित संशोधनासाठी या ग्रंथाची निश्चितच मदत होईल.
Swatantyacha Amrut Mahotsav : Khandeshchi Vatchal