ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. यामुळे सर्व संस्थांमध्ये ग्रंथालय असणे अपरिहार्य आहे आणि जेव्हा शैक्षणिक संस्थेचा विचार केला जातो तेव्हा ग्रंथालय एक अपरिहार्य साधन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हा एक परिपूर्ण विषय असून त्याअंतर्गत व्यवस्थापन, वर्गीकरण, तालिकीकरण, संदर्भसेवा, माहितीसेवा, माहिती तंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये या सर्व विषयांशी निगडीत संगणक आणि इंटरनेटच्या अंतर्भावामुळे शिक्षणक्रमाने आणि ग्रंथालयीन सेवा देण्याचे स्वरूपही बदललेले आहे. माहिती साधनांचे बदलते स्वरूप, माहिती वाचकांना उपलब्ध करून द्यावयाची पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. अर्थात ग्रंथपालनाचे तत्वज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून ग्रंथालयांच्या सेवा वाचकांना पुरविणे हेच ग्रंथालयाचे उद्दिष्ट असायला हवे. त्यादृष्टीने ग्रंथपालन क्षेत्र कार्यरत झालेले आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेले आहेच की, “ग्रंथालय हे संस्थेचे हृदय आहे.”
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयावर जास्तीत जास्त वाचनसाहित्य हे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. मराठीत वाचनसाहित्य फारच थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील संबंधित वाचकांची गरज लक्षात घेऊन सदर ग्रंथ हा वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ स्वरुपात मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आला असून त्यात प्रत्येक संकल्पना समजावी यासाठी इंग्रजी भाषेतही त्याला पर्यायी शब्द दिले आहे. सदर ग्रंथ लिखाणासाठी लेखकांनी विविध इंग्रजी व मराठी भाषेतील संदर्भग्रंथाचा आधार घेतलेला आहे. विविध भाषेतील नियतकालिकातील लेख व इंटरनेट वरून अभ्यासक्रमाशी संबंधित विविध डेटाबेसमधून माहिती शोधून त्या माहितीचा सदर ग्रंथ लिखाणाला मदत झाली. सदर ग्रंथ वर्णनात्मक स्वरुपात तयार करण्यात आलेला आहे. सदर ग्रंथाचा उपयोग ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील पदवी व पदव्युत्तर करणारे विद्यार्थी व ग्रंथालय आणि माहितीशास्त्रात स्पर्धात्मक परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो.