शास्त्र (विज्ञान), समाजशास्त्र व साहित्यादी कला, अशा विविध मानवीजीवनाशी निगडित विद्याशाखा अस्तित्वात असून त्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. कुठल्याही शाखेसाठी अमुक एक सर्वगामी व मूलगामी अशी संशोधन पद्धत निश्चित केलेली आढळून येत नाही, म्हणून काही विषयात झालेले संशोधनपर लेखन पाहिले, तर संशोधन हे एक शास्त्र असूनही अभ्यासकांमध्ये विरोधाभास आढळतो. तेव्हा काही संशोधनपर ग्रंथांचा समग्रतेने विचार करून संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी एक सुलभ सुटसुटीत असे ‘साहित्य व समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’चे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना एकाच पुस्तकात क्रमबद्ध, सूत्रबद्ध व परिपूर्ण अशी माहिती आढळून आलेली नाही. जसे- संशोधन पद्धती किती व कोणत्या? संशोधनाची संकल्पना व स्वरूप कसे? संशोधनाचे प्रकार नेमके किती व कोणते? व त्याचा क्रम कसा असावा?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य आणि समाजशास्त्रातील वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी मांडणी या ग्रंथात केलेली आहे.
– प्रा. उन्नती संजय चौधरी