शीतल पाटील यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मोठ्या आत्मविश्वासाने खान्देशी मराठी कवितेत पदार्पण करीत आहे. ‘मायभूमी अन् मायबोली दोन्ही जुळ्या बहिनी’ असे अभिमानाने सांगणाऱ्या ह्या कविता बहिणाबाई चौधरी परंपरेतला एक देखणा प्रयोग वाटला. मराठीच्या बोलींमध्ये दडलेले शब्दभांडार किती समृद्ध आहे, याची प्रचीती ह्या कविता वाचणाऱ्यांना प्रकर्षाने जाणवेल. आमच्या पिढीला त्या वेळच्या रटाळ प्रेमकविता लिहिणाऱ्या कवयित्रींनी उबग आणला होता. आता शीतल पाटील सारख्या शेतकऱ्याच्या मुलींनी मोठीच क्रांती करून आपल्या मातीतले वेल्हाळ देशीपण दाखवायला लागल्यापासून इंग्रजीच्या वापराने आणि शहरीकरणाने बुडायला घातलेल्या मराठी भाषेचे ऐश्वर्य टिकवून धरले आहे. ‘सुखदुःखाची घागर ज्याच्या त्याच्या पाठीवर’ अशा कष्टकऱ्यांच्या प्रतिमांनी आणि ह्या आधी प्रमाणभाषेत कधीही न आलेल्या खान्देशी बोलीतील शैलीप्रयोगांनी ह्या संग्रहातली प्रत्येक कविता देखणी झाली आहे. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या झाल्या कृत्रिम पद्यरचना करणाऱ्या तेव्हाच्या कवींना बांगड्या भरायला लावल्या. आता तशा कवयित्री आणखी वाढतील आणि मराठी कविता अधिकाधिक मातृधर्मी होईल अशी चिन्हे ह्या कवितांमध्ये दिसू लागली आहेत, ही उत्साहवर्धक प्रगती आहे. शीतल पाटील सर्वत्र वाचल्या जावोत, ही शुभेच्छा!
– भालचंद्र नेमाडे,
मुंबई
Manachya Banamandhi