Your cart is empty now.
संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पूत्र होते. इ.स. 1680 ते 1689 अशी त्यांची राजकिय कारकिर्द. म्हणजेच त्यांनी छत्रपती म्हणून एकूण नऊ वर्षे राज्यकारभार केला. या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी अव्दितीय अशी होती. त्यांना आप्तस्वकीय व परकिय अशा दोघांनाही एकाचवेळी तोंड द्यावे लागले होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष औरंगजेब बादशाहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत आलेला होता. याशिवाय इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी या परकिय सागरी सत्ताही मराठ्यांचा प्रदेशाला वारंवार त्रास देत होत्या. त्यांचाही बंदोबस्त करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर होती. संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द सुरु झाली तेव्हा सगळीच परिस्थिती प्रतिकुल होती असे आढळते. तरीही अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून
त्यांनी आपले राज्य व संस्कृती टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ह्या स्वराज्य व संस्कृती रक्षणार्थच त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. औरंगजेब बादशाहाने त्यांचा क्रूर असा वध केला. पण त्यांच्या वधामुळे सगळा महाराष्ट्र पेटून उठला. आपल्या राजाच्या वधाचा बदला आपण घेतला पाहीजे ही जाणीव महाराष्ट्रातील सामान्य जनतेला झाली त्यासाठी सगळे महाराष्ट्रीयन एक झाले. त्यांच्या हौताम्याने स्वांतत्र्ययुद्धाचे होमकुंड प्रज्वलित झाले आणि असंख्य मराठे आपल्या प्राणांची आहूती देण्यास सज्ज झाले. या स्वांतत्र्ययुद्धात औरंगजेबाला शेवटी मृत्यू आला; पण त्याला मराठ्यांचे राज्य जिंकता आले नाही. एवढी उर्मी मराठ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांमुळे निर्माण झाली होती. नऊ वर्षांच्या अल्पकारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा संक्षिप्त इतिहास विद्यार्थ्यांपुढे आणण्याचा अल्पसा प्रयत्न या ग्रंथाच्या रूपाने करण्यात आलेला आहे. प्रस्तुत ग्रथांचे लिखाणासाठी विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. उपयुक्त ठरलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी मागे दिलेलीच आहे.