Your cart is empty now.
महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू झालेली पहिली सामाजिक चळवळ म्हणून सत्यशोधक चळवळीचा विचार होतो. तत्कालिन समाज व्यवस्थेत ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व खूप वाढले. त्यांनी बहुजन समाजाला रूढी, प्रथा, परंपरा तसेच अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवल्याने सत्यशोधक चळवळीने त्याचा प्रचंड विरोध केला. धार्मिक परंपरावादाला व अंधश्रद्धेला आव्हान देणारी तसेच मुस्लीम समाजात आधुनिक सुधारणावादाचे बिजारोपण करून प्रबोधन घडवून आणण्यात मुस्लीम जगतातील पहिली चळवळ म्हणून मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करावा लागतो. हिची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे 22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लीम युवकांच्या बैठकीत केली. यासोबतच दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आदिवासी चळवळींचा देखील उल्लेख करावा लागेल. क्रांतीकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात भारताच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गती घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याचप्रमाणे बिहार व अन्य राज्यांतही आदिवासी चळवळी अत्यंत तीव्र व व्यापक स्वरूपाच्या होत्या. पण महाराष्ट्रात मात्र तसे आढळून येताना दिसत नाहीत.