Your cart is empty now.
ज्ञानाचा, कौशल्याचा सतत वापर करत राहिलो तर नवनव्या संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होते. जितके आपण आपल्या कुवतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्याच्या कक्षा रुंदावत जातात. व्यक्तिमत्त्वाच्या विविध पातळ्यावर आपली गुणवत्ता वाढते फुलत जाते. त्यातूनच दृष्टिकोन, वैशिष्ट्ये, मूल्ये, स्वभाव तयार होत राहतात हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (भारताचे मिसाईल मॅन) यांचे अग्निपंख 2003 या पुस्तकातील वाक्य मनाला आंतरिक प्रेरणा देऊन जाते.
भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP 2020) स्वीकारलेले आहे. महाराष्ट्र शासनानेही एनईपी 2020 स्वीकारलेले असून त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम संरचनेतबदल केलेले आहेत. भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन व सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. सहकार्य, सेवा, त्याग, सहिष्णुता या मूल्यांवर आपली संस्कृती आधारित आहे. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर आपण शिक्षण पद्धतीत ज्या ज्या वेळी सुधारणा करण्यात आल्या त्या प्रत्येक वेळी चारित्र्यसंवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना या बाबींना अग्रक्रम देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने जून 1997-1998 पासून शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण याविषयाचा आवश्यक विषय म्हणून समावेश केला आहे. तर डी.एल.एड, बी.एड., एम.एड., एम.ए.- शिक्षणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुद्धा आवश्यक विषय म्हणून समावेश केला आहे. आपल्या देशाच्या 1986 व 2020 च्या शैक्षणिक धोरणातही मूल्यशिक्षण याबाबीवर अधिक भर देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामधून मूल्यशिक्षणाची मोठ्या उत्साहाने कार्यवाही होत आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीत अनैतिकता, भ्रष्टाचार आणि ताणतणाव यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन पिढीला मूल्यांची घट्ट जोड मिळणे आवश्यक आहे. हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजून त्यांना आदर्श बनवण्याचे काम करेल. या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे हा नसून विद्यार्थ्यांच्या आचरणात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे. पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे नैतिक विकास, चारित्र्यनिर्माण, दैनंदिन जीवनात उपयोग व मूल्ये प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मला आशा आहे की हे पुस्तक केवळ वाचले जाणार नाही तर विद्यार्थी त्यातील मूल्यांचा अवलंब करतील. मूल्यशिक्षण मुलांना कथा सांगण्याचा त्यांना मूल्यांची सूक्ष्मपणे ओळख करून देण्याचा आणि त्यांना दैनंदिन जीवनात निरीक्षण करण्यास, आत्मसात करण्यास आणि निरंतर अनुभवण्यास मदत करण्याचा वारसा पुढे नेतो. तसेच मूल्यशिक्षण पुस्तक शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या शैक्षणिक मूल्यांचे पालन पोषण करताना विद्यार्थ्यांचे वर्तन ओळखण्यास हे पुस्तक मदत करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 लागू झाल्यानंतर मूल्य आधारित शिक्षण हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू बनले आहे. ज्यामध्ये रोल लर्निंगपेक्षा समग्र विकासावर भर देण्यात आला आहे. आज मूल्यशिक्षण हा UGC NET/SET पेपर 1 सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जिथे वारंवार विधान आधारित, जुळणी पुढील आणि खरे/ खोटे स्वरूपा मध्ये प्रश्न विचारले जातात. मूल्यशिक्षण हे केवळ कुशलच नाही तर सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या देखील बुद्धीमान पिढी घडवण्यासाठी केंद्रस्थानी बनले आहे. शैक्षणिक जगतात दिवसागुणिक बदल होत असतात आणि त्याचे प्रतिबिंब शैक्षणिक प्रवाहात दिसून येते. मूल्यशिक्षणाचे शरीर जरी आवाढव्य असले तरी त्याचा आत्मा एकच आहे. या पुस्तकामध्ये मी बऱ्याचशा आकृत्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण छोट्याशा आकृतीच्या माध्यमातून मोठा आशय समजून देण्याचे कार्य आकृतीमुळे होते म्हणून या आकृत्यांचा फायदा वाचकांना होईल अशी अपेक्षा आहे. आजचा बालक उद्याचा भावी नागरिक म्हणून घडविण्यामध्ये या मूल्यशिक्षणाचे स्थान महत्त्वाचे आहे.
मूल्यशिक्षण केवळ शाळा महाविद्यालयातून दिले जाते असे नाही तर निसर्गाच्या सानिध्यातून, माणसामाणसातून, घरातून,गावातून, राज्यातून व देशातून माहिती मिळते. त्याचा संबंध व्यावहारिकतेशी जोडला जातो आणि त्यातील ज्या आदर्श स्वरूपाचे असते ते मूल्य कोणत्या ना कोणत्या कार्यातून, अनुभवातून मिळत असते. जे जे मिळते त्यावर मनुष्य जगत असतो आपले जीवन चालत असतो म्हणून मूल्यशिक्षण म्हणजेच जीवनशिक्षण होय. मानवी जीवनाच्या विकासाला गती देण्याचे सामर्थ्य ज्यात असते ते मूल्यशिक्षण होय.