Your cart is empty now.
संपूर्ण त्यागाने समाजाच्या निष्काम सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे लोक महापुरुष म्हणून उदयाला येतात. हा जणू निसर्गाचा कायदा वाटतो. या कायद्याला अनुसरून समाज व राष्ट्र कल्याण साधणाऱ्या महापुरुषांपैकी एक असामान्य नाव म्हणजे महात्मा गाडगे महाराज. चार भिंतीच्या शाळेतलं औपचारिक शिक्षण घेवू न शकलेल्या डेबूजीस सिमारहित समाजशाळेत अनुभूतीचे शिक्षण मिळाले. संवेदनशील, सकारात्मक, निष्पाप, निष्काम, निरलस मन असेल तर चित्रवृत्ती संपतात, बुद्धीशुद्ध बनते, मनुष्य प्रज्ञावंत घडतो. अचाट ग्रहणक्षमता हे सामर्थ्य बनतं. ज्ञानेद्रियांकडून ग्रहण केलेल्या माहितीचे परोपकारासाठी प्रेरणा देणाऱ्या ज्ञानात रूपांतर होते. संत गाडगेबाबा या अर्थाने क्रियाशील, शुद्ध आचरणाने परिपूर्ण असे प्रज्ञावंत होते म्हणूनच शहाणे ज्ञानवंत होते. म्हणून गाडगेबाबांमध्ये गरीबीत पिढ्यांन्पिढ्या पिचनांऱ्यांबद्दल, अंधश्रद्धेने रस्ता भरकटलेल्यांबद्दल, दलित, पिडीत, ग्रामीण जनतेबद्दल जिव्हाळा होता, आदर होता, टोकदार संवेदना होत्या. या सामर्थ्यामुळे संसाराचे पोलादी साखळदंड तोडून बाबांना अनासक्त होता आलं, निरिच्छ होता आलं, संसारातून सन्यास घेता आला. ही त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्रांती होती. या क्रांतीकारक पहिल्या पाऊलांमुळेचे त्यांचे शेवटचे पाऊल महात्मा, संत, महाराज, महापुरुष, महामानव या सर्वेाच्च पातळीवरुन पडले. निरक्षर डेबूजी जगात महात्मा समजल्या जाणाऱ्या गांधींजी एवढे आणि जगात सर्वात जास्त विद्वान समजल्या जाणाऱ्या, महामानव म्हणून नामांकित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढे महापुरुष म्हणून नावारूपाला आले हे महान आश्चर्य आहे. या अतुलनीय महापुरुषास शतशः अभिवादन!