Your cart is empty now.
कवितेचे अध्यापन करताना तिचे आकलन एकतर शब्दाच्या आणि अर्थाच्या अंगाने भाषिक पातळीवर व्हावे लागते. कविता ही कोणत्यातरी भाषेत उमटलेली एक उक्ती असते. या उक्तीला कानांवर पडणारे एक शब्दरूप असते आणि मनात समजणारे एक अर्थरूप असते. कवितेची भाषा व्यावहारिक भाषेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात निराळी, काहीशी कृत्रिम असते. ती किती वेगळी असेल ते त्या त्या काळातील संकेत कसे आहेत आणि कवीने त्या संकेतांची कितपत बूज राखली आहे यावर अवलंबून असते. म्हणून अध्यापकाने कविता सुयोग्यपणे वाचायला हवी. त्यातून कवितेचे शब्दरूप तर प्रकट होईलच, पण तिचा अर्थ समजायलाही पुष्कळच मदत होते. कवितेतील एका शब्दाचे नाते दुसऱ्या शब्दाशी कसे लागते, शब्दांचे नाते त्याच्या अर्थाशी कसे लागते, अर्थाचे नाते जगण्याशी आणि समाज-संस्कृतीच्या खळाळत्या प्रवाहाशी कसे लागते याची एकसंध रीतीने प्रचीती येईल असे कवितेचे अध्यापन अपेक्षित आहे.
– डॉ. आशुतोष पाटील