Your cart is empty now.
आम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.
अभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.
या विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.
इथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे.