Your cart is empty now.
पाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.