Your cart is empty now.
15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. वास्को-द-गामा याने नव्या जलमार्गाचा शोध लावल्याने अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांनी भारताशी व्यापारी संबंध निर्माण केले. तद्नंतर ते सत्तास्पर्धेत उतरले; यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डचांचा समावेश होता. ब्रिटीशांनी कट कारस्थान करुन प्लासीची लढाई जिंकून ब्रिटीश सत्तेची पायाभरणी केली. 1857 मध्ये भारतीयांनी बंडाचे निशाण फडकावून अन्यायी, अत्याचारी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. इंग्रजांनी फोडा आणि झोडा या अनितीचा अवलंब केला. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. 1905 ते 1920 या कालखंडात काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व लाल, बाल व पाल या त्रिमूर्तींनी केले. टिळकयुगानंतर महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या देशभक्तांना फाशी दिल्याने तरुणवर्ग असंतुष्ट झाला. अनेक क्रांतिकारकांनी प्राणाहुती दिली. दुसर्या जागतिक महायुद्धास सुरुवात झाली. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज स्वातंत्र्यासाठी त्वेषाने लढू लागली. म. गांधींनी चले जाव चळवळीस प्रारंभ केला. जागतिक महासत्ता म्हणून अमरिकेचा उदय, प्रतिकूल जागतिक जनमत, इंग्लंडची खालावलेली परिस्थिती, आझाद हिंद फौज, चले जाव चळवळ व भारतीयांचे राष्ट्रप्रेम यामुळे ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले. खंडित भारताची निर्मिती करतांना अखंड भारतास ग्रहण लावले. सरदार पटेलांनी संस्थानिकांचा प्रश्न सोडवून तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहून स्वतंत्र व प्रगतीशील भारताचा प्रवास सुकर केला.