Your cart is empty now.
महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ वाचून मी अतिशय प्रभावित झालो. माझ्या विचारामध्ये विलक्षण परिवर्तन झाले. कारण महात्मा जोतीराव फुलेंनी त्या काळात केलेले कार्य आणि मांडलेले विचार किती महत्त्वपूर्ण होते. याची जाणीव झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्ध उभारलेले क्रांतीकार्य तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीमध्ये परिवर्तन करण्याकरिता प्रेरणादायी ठरले व आधुनिक पुरोगामी इतिहासामध्ये महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. यातूनच पुरोगामी विचाराला चालना देणारा एक नवीन वर्ग निर्माण झाला.
महात्मा जोतीरावांच्या विचाराचा व त्यांच्या क्रांतीकार्याचा प्रभाव भारतीय दलित, पीडित, शोषित, शेतकरी आणि स्त्री वर्ग यांच्या जीवनांवर परिणामकारक ठरला. प्रस्थापित समाज व्यवस्थेने हजारो वर्षापासून शूद्र आणि स्त्री वर्गाला अज्ञानाच्या रूढी, प्रथा, परंपरा आणि धार्मिक कर्मकांडामध्ये गुरफटून ठेवले होते. त्यामुळे त्यांचा विकास घडून येत नव्हता. हे जोतीरावांनी हेरले आणि या सर्व अन्यायी प्रथापरंपरावर घनाघाती हल्ला चढविला व शोषित, वंचित व परंपरेने नाकारलेल्या दुर्लक्षीत घटकाला त्यांचे निसर्गनिर्मित हक्क मिळवून दिले, या सामाजिक परिवर्तनासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व बुद्धीप्रामाण्यवादाच्या तत्त्वावर आधारित नवसमाज उभा करण्याचा प्रयत्न जोतीरावांनी आपल्या अथक परिश्रमातून केला म्हणून त्यांच्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो.
महात्मा जोतीराव फुल्यांनी आपल्या कृतीतून व विचारातून नव्या आधुनिक विचारांचा नवसमाज घडविण्याचे केलेले मौलिक कार्य माझ्या प्रस्तुत ग्रथातून मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे.