Your cart is empty now.
मानवी संसाधन हे कोणत्याही संस्थेचे सर्वांत महत्त्वाचे आणि गतिशील संसाधन आहे. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड, तिचा विकास, कार्यक्षमतेत वाढ, प्रेरणा, मूल्यमापन आणि संस्थेशी सुसंवाद या सर्व बाबींचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक असते. आधुनिक काळातील तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, जागतिकीकरण, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलती कार्यसंस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या अपेक्षा यामुळे मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये व्यावसायिक कौशल्ये, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि रोजगारक्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. याच दृष्टिकोनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार टी.वाय.बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी ‘मानव संसाधन व्यवस्थापन’ हे पुस्तक तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
या पुस्तकामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाची संकल्पना, स्वरूप, उद्दिष्टे व महत्त्व, मानव संसाधन नियोजन, नोकरी विश्लेषण, मानव संसाधनाची भरती व निवड प्रक्रिया, प्रशिक्षण व विकास, कार्यप्रदर्शन मूल्यमापन, वेतन व मोबदला व्यवस्थापन, कर्मचारी कल्याण, औद्योगिक संबंध, कर्मचारी प्रेरणा, नेतृत्व, कामाच्या ठिकाणी बदलते वातावरण तसेच आधुनिक मानव संसाधन व्यवस्थापनातील विविध प्रवाह यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना केवळ समजून घेता याव्यात एवढेच नव्हे, तर त्या संकल्पनांचा व्यावहारिक जीवनात उपयोग करता यावा, हा या पुस्तकामागील मुख्य उद्देश आहे.
पुस्तक लेखन करताना विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेचा विशेष विचार करण्यात आला आहे. प्रत्येक घटकातील विषय शक्य तितक्या सोप्या, सुबोध आणि प्रवाही भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे, मुद्देसूद स्पष्टीकरणे, व्यावहारिक संदर्भ आणि अभ्यासासाठी उपयुक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परीक्षेच्या दृष्टीने तसेच स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक जीवनासाठीही उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.