Your cart is empty now.
‘साहित्य समीक्षा शोध आणि बोध’ हा डॉ. अनंता सूर यांचा समीक्षाग्रंथ म्हणजे एकंदरीत बावीस कलाकृतींचा वाड्मयीन शोध आणि बोध आहे. हा वाड्मयीन शोध आणि बोध त्यांनी बारा काव्यसंग्रह, दोन कथासंग्रह, चार कादंबऱ्या आणि चार आत्मकथनांच्या अनुषंगाने घेतलेला आहे. डॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील कवी, कथाकार, आत्मकथनकार व कादंबरीकार असल्यामुळे त्यांच्या समीक्षेचा सूर बव्हंशी नव्वदोत्तरी साहित्यकृतींशी जुळलेला दिसतो.
मराठी समीक्षेचा आणि समीक्षकांचा महत्त्वाचा दोष म्हणजे ती समीक्षा एकसूरी आहे. त्यामुळे मराठीतील जुन्या पिढीतील समीक्षक नव्या पिढीतील कवी, लेखक काय लिहीत आहेत याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. डॉ. अनंता सूर यांनी या समीक्षाग्रंथात एकंदरीत या बावीस कलाकृतींवर सखोलपणे भाष्य केले आहे. त्या सर्वच्या सर्व कलाकृती खाउजा संस्कृतीचे अपत्य आहेत. खाउजा संस्कृती म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. ह्या तीन बाबींचा या ना त्या प्रकारे सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम झालेला आहे. डॉ. अनंता सूर यांचे हे समीक्षा लेख त्या त्या कलाकृतींवर उचित आणि चिंतनशील भाष्य करणारे आहेत. खाउजा संस्कृतीने समाजाची घडी बसवली की विस्कटवली ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या या कलाकृती आहेत. काळ कोणताही असो प्रत्येक काळात जो हतबल आहे तो कसा शोषित आणि वंचित ठरतो हेच यातील प्रत्येक समीक्षा लेखातून प्रत्ययास येते. आजच्या कालखंडावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी हा समीक्षाग्रंथ मोलाची भूमिका बजावेल यात मला शंका नाही.
– डॉ. सुहासकुमार बोबडे
ज्येष्ठ साहित्यिक, कराड
Sahityasamiksha : Shodh Aani Bodh