-
राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती
Rs.110.00संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.
सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.
सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.
Rajyashastratil Sanshodhan Paddhati
-
ललितरंग
Rs.95.00सदर पुस्तकात सात लेखकांच्या ललित गद्य लेखनाचा समावेश केला आहे. ‘स्त्रीविषयक ललित गद्य’ असे सदर पुस्तकातील ललित गद्याचे विशिष्ट असे सूत्र आहे. स्त्री आणि पुरुष दोहोंचा म्हणजे ‘मी’चा लेखनातून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्या अंगाने घटना-प्रसंग, व्यक्ती याबाबत ‘मी’चे व्यक्त होणे, भावनात्मकता आणि चिंतनशीलता यातून स्त्रीविषयक अनुभवाचा अन्वयार्थ लावू पाहणे या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्त्रीविषयक ललित गद्याचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सदर पुस्तक आकारास आले आहे. लेखक स्त्री असो वा पुरुष, दोहोंच्या निवडक ललित गद्य लेखनाचा अंतर्भाव येथे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे समकाळातील, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडातील लेखकांचे हे ललित गद्य लेखन आहे. साहित्य, सामाजिक चळवळ, चित्रपट, पत्रकारिता अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वयंपूर्ण ठसा उमटविणार्या व्यक्तित्वांची-त्यांच्या संवेदना आणि विचारांची ही ललित गद्यात्मक अभिव्यक्ती आहे.
Lalitrang