ओंजळभर फुलं बागेतली, रानातली, तोडलेली, वेचलेली, लाल, पिवळी, केशरी, गुलाबी, पांढरी, नाना रंगाची, नाना ढंगाची, नाना तर्हेची, मनमोहक! चित्ताकर्षक! मनाला फुलवणारी, हृदयाला गंधाळणारी अन् शरीरभर अत्तर उधळणारी! फुलं-सृष्टीला पडलेलं स्वप्न! हिरव्यागार वनश्रीचा गंधित अविष्कार! झाडाझुडपात दडलेलं नाजूक रत्न! चमकणारं! दरवळणारं!
मानवी भावभावनांचं, सुख-दु:खाचं, हर्ष-उल्हासाचं, व्यथा-वेदनांचं फुलं अविष्कार करतात! हृदयातून घरंगळणार्या प्रत्येक क्षणाचं प्रतिनिधित्व करतात! कोमल भावधारेला गंधाच्या चोचीने शब्दरूप देतात! मुग्ध भावनेला सुगंधी कंठाने गाऊन दाखवतात! प्रचंड मदनाला शृंगाराची सेज देतात! उधाणलेल्या वादळाला कवेत घेणारा किनारा बनतात!
मानवी भावनांचं, कल्पनांचं, विचारांचं वहन करणारी फुलं! जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सुंदरतेची रूप देणारी फुलं असतात तरी कशी? त्यांना सुख-दु:ख असतं? हर्ष-खेद असतो? आशा-निराशा असते? यातना-वेदना असते? – होय. फुलांनाही मन असतं! हृदय असतं!! फुलही हसतात. बेधुंद होऊन नाचतात! देठांच्या खांद्यावर मान टाकून मुसमुसून रडतात! विरहाने व्याकूळ होऊन क्षितिजाच्या आरपार पाहत बसतात! मिलनासाठी पाना-पानांवर हिंदोळत राहतात!
फुलांची बैचेनी ढगाला कळते. फुलांचं दु:ख झाडाला छळतं अन् फुलांचे अश्रू माती गिळते! फुलांचा गंध वारा पितो! फुलांचा मकरंद भ्रमर चोरतो! फुलं मात्र शांत असतात. मुग्ध बालिकेसारखे. भिरभिरणार्या पाखराकडे पाहत. पाकळ्या खुडणारे फुलांच्या काळजाला नख लावतात. फुलं मुक्तपणे सारं सहन करतात! त्यांचं आयुष्यच मुळी क्षणभंगूर! उमलणे-फुलणे-कोमेजून जाणे. उत्त्पती-स्थिती आणि लय. सृष्टीचक्राचा अपरिवर्तनीय नियम! आपल्या या क्षणिक अस्तित्त्वाने ते भूतलावर सौंदर्य व सुगंध पेरून जातात. मनामनांना फुलवून जातात.
Onjalbhar Phool