काव्या नंतर थोडसं आणखीही….
मी बोलका झाल्यावर आजी सांगायची –
80 मैल आहे अकोला आपल्या गावाहून. पायी गेला होता माहा सिताराम. पायात चप्पल नाही, पण गेला. बाबासाहेबाचं भाषण ऐकाचं होतना त्याले. ऐकून जसा घरी आला. पहलेच पहलवान, त्यात बाबाचं भाषण, वाघच दिसत होता तो. त्या वाघानं काय केल माहीत? तिसऱ्या रोजी तुझा जन्म झाला. अन त्यानं तुझं नाव भीमराव ठेवलं. आजी सांगायची – त्यावेळचे बाबासाहेबांचे जेष्ठ पुत्र, आमच्या पिढीचे बाप, असेच होते निष्ठावान. धर्मांतराच्या आधीच देव देव घराबाहेर केलेले. बाप म्हणून त्यांचे नाव लावायचे असेल तर…. त्यांचा आदर्श, हिम्मत स्वीकारावी लागेल.
आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक साहित्यिक, वैज्ञानिक, आदिवासी विषयक, कामगार, मजदूर, शेतकरी, जातीय सलोखा, पर्यावरण इ. विचार मंचावरून आंदोलनातून प्रदीर्घ प्रवास केला. या प्रवासात अनेक हात मदतीला आले. आई-वडील, लहान-मोठे भाऊ तुळशीरामजी, लक्ष्मणरावजी, बळीरामजी आणि अशोकराव तसेच सहधर्मचारिणी शब्दाला सार्थक करणारी, जगवणारी सतत साथ देणारी पत्नी मंदाकिनी आणि भविष्यकाळ बिनधोक करणारी दोन्ही लेकरं! साहित्याच्या प्रवाहात महाराष्ट्राला सतत जागृत ठेवणारे बहुआयामी मित्रवर्य विजयकुमार गवई ज्यांनी अनेक लहान मोठे कलाकार घडविले, जगवले. त्यांचा हात सतत हातात राहिला.
ज्यांच्यामुळे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले ते दादासाहेब तोंडगावकर. तसेच अशोकराव पळसपगार, राजेश लबडे व रवि चौरपगार यांच्यामुळे संग्रहाचे नियोजन सुखकर झाले. सतीश इंगोले, राम अभ्यंकर, दयाराम राउत, रूपनारायण, बडगे सर, बऱ्हाटे सर, राजाभाऊ इंगळे, डॉ. शेजव, डॉ. हिवरकर आणि रामदास ठवरे इत्यादींनी दिलेल्या सतत जाणिवा आणि सहकार्यामुळे इथपर्यंत मजल मारली. आणखीही खूप आहेत… त्याच्या शालेय शिक्षणापासून साथ देतोय संजय कोरे… शिक्षण व कर्तृत्वाचा उल्लेख करावा असे मित्र म्हणाले पण या क्षेत्रात बाबांची लेकरं इतकी पुढे गेलीत की आपल्याविषयी सांगणं म्हणजे सूर्या समोर दीपक दाखवणे किंवा ‘जुगनू चाँद के सामने’ ! ज्ञानदानाचे कार्य करता करता उपप्राचार्य म्हणून सेवा निवृत्त झालो. माझ्या प्रत्येक कार्याची प्रेरणा, माझे बळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच रंजल्या गांजलेल्यांची जीवन शक्ती.
ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वाला समता, स्वातंत्र्य, न्याय, करुणा, प्रज्ञा व बंधुत्वाची भाषा शिकवली त्यांनीच आमच्या हाती जगातील महान अस्त्र-लेखणी दिली आणि त्याच लेखणीतून आज शब्दांचं अंकुरण होत आहे. हे शब्दफुलांचे अंकुरण म्हणजे माझा कविता संग्रह “लेकरा बाबाला गमावू नको”!
– आपला
बी. एस. इंगळे,
‘चेतन’, परतवाडा, जि. अमरावती.